इस्रायलवर इराणचा महाभयंकर हल्ला! 12 तासांपासून क्षेपणास्त्रांचा पाऊस; हिजबुल्लाचेही रॉकेट हल्ले सुरूच

Foto
तेल अवीव: मध्य आशियातील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणनेइस्रायलच्या विविध शहरांवर गेल्या 12 तासांपासून क्षेपणास्त्रांचा धडाका लावला आहे. इस्रायलच्या दक्षिण, मध्य आणि उत्तर भागात सातत्याने स्फोटांचे आवाज ऐकू येत असून नागरिक बंकरचा आधार घेत आहेत. याच वेळी उत्तरेकडून लेबनॉनस्थित हिजबुल्लानेही रॉकेट हल्ले चढवून इस्रायलची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्वात भीषण हल्ला दक्षिण इस्रायलमधील इलात शहरात झाला आहे. येथे इराणने डागलेले क्लस्टर म्युनिशन पडल्याने त्याचे अवशेष शहराच्या विविध भागात पसरले. यामुळे किमान 10 ठिकाणी मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचाही समावेश असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरांमध्ये आगीचे तांडव आणि घबराट
लोड, बनेई ब्राक आणि रामला या शहरांमध्ये सुरुवातीला क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आग लागल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर प्रशासनाने स्पष्ट केले की, येथील आगीचा क्षेपणास्त्रांशी थेट संबंध नाही.

वृद्धांना दुखापत
आगीच्या घटनांमध्ये दोन 80 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराणच्या हल्ल्यांवेळीच उत्तर सीमेवरून हिजबुल्लानेही रॉकेटचा वर्षाव केल्याने इस्रायली संरक्षण यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. इस्रायलने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण केली असून, आगामी काही तास संपूर्ण जगासाठी अत्यंत चिंतेचे ठरणार आहेत.